मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'अजितदादांचा उत्तराधिकारी कोण?' आणि 'उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार?' या चर्चांना उधाण आले असतानाच सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, "आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली, तरी त्यांच्याशी उपमुख्यमंत्रिपद किंवा इतर कोणत्याही राजकीय विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. अजितदादांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे आणि आम्ही अद्याप त्या दु:खातून सावरलेलो नाही." राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत आणि भविष्यातील राजकीय निर्णयांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पवार परिवाराला विश्वासात घेतले जाईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पक्ष आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. दादांच्या अपघाती एक्झिटने पक्षात सध्या शोकाकुल वातावरण असून, सत्तेच्या समीकरणांपेक्षा परिवाराच्या भावनांना प्राधान्य दिले जात असल्याचे तटकरेंच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet) सादर केले आहे. या तपास अहवालात ...
सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार...
सुनील तटकरे यांनी आज भावूक होत आपली भूमिका मांडली. "दादांच्या जाण्याच्या धक्क्यातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. सुनेत्रा वहिनी आणि त्यांचा परिवार सध्या धार्मिक विधींमध्ये व्यस्त आहे. हे विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू. आमचे आमदार आणि जनतेच्या मनात काय आहे, हे जाणून घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल," असे तटकरे यांनी स्पष्ट केले. दादांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात पाऊल ठेवणे अत्यंत क्लेषकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र राजकीय घडामोडींवर थेट भाष्य केले आहे. अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची आग्रही मागणी होत आहे. भुजबळ यांनी माहिती दिली की, "उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, त्यामध्ये पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाईल. जर या बैठकीत एकमत झाले, तर उद्याच नव्या नेत्याचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे." या विधानामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत असून, उद्याचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पार्थ पवारांचा प्रस्ताव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत पार्थ पवार यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊन उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी आणि त्याचवेळी आपल्याला राज्यसभेवर पाठवून दिल्लीत काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी पक्षाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याने रिक्त झालेली पदे आणि राजकीय वारसा जपण्यासाठी पार्थ पवारांनी सुचवलेला हा 'फॉर्म्युला' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार आहे. आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यानंतर आमदारांच्या संमतीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार तसेच प्रस्ताव राज्यपाल याना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांच्या समंतीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.