मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने यासाठी अनोख्या पध्दतीने पादचारी तथा नागरिकांची यातून सुटका करण्याचा निर्धार केला आहे. रेल्वे स्थानकामध्ये जाण्यासाठी तथा स्थानकातून बाहेर पडण्यासाठी केशवसूत उड्डाणपूलाखालील गाळ्यांमध्ये स्टिलचे बोलार्ड बसवले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर गाळा क्रमांक एकमध्ये हे बोलार्ड बसवण्याचे काम सुरु असून त्यानंतर नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशाप्रकारची व्यवस्था सर्वच गाळ्यांमध्ये केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाशेजारी सेनापती बापट मार्गावरुन जाणाऱ्या केशवसूत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रेल्वे प्रवाशी तथा नागरिकांना चालताना अडचणी येत आहेत. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या जागेवर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकासह मंदिर, न्यायालय, शाळा कॉलेज तसेच मंडई आदींच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे बंदी आहे. तरीही दादर रेल्वे स्थानकासह सर्व रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुर्ला येथील फेरीवाल्यांकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वाढत्या फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दादर पश्चिम येथील वाढत्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने केशव सूत उड्डाणपूलाखालील गाळा क्रमांक १ म्हणजे सुविधासमोरील आणि पोलिस चौकी असलेल्या गाळ्यामध्ये स्टिलचे बोलार्ड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याचे काम सुरु असून याअंतर्गत पोलिस चौकी इथून हटवून नागरिकांना रांगेतून ये जा करण्यासाठी अशाप्रकारचे बोलार्ड बसवले जात आहे. या बोलार्डमुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नसून त्याठिकाणी फेरीवाल्यांचे साहित्य असल्यास अथवा फेरीवाला व्यवसाय करत असल्याचे दिसून आल्यास त्यांचे साहित्य जप्त केले जाणार आहे. सध्या या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांचे साहित्य असले तरी जप्त होत नसले तरी बोलार्ड बसवल्यानंतर महापालिकेच्यावतीने तिथे साहित्यही ठेवता येणार नसून त्यामुळे नागरिकांच्या मार्गावर हे साहित्य असल्याने ते जप्त करण्याचे अधिकार पूर्णपणे महापालिका आणि पोलिसांना असणार आहेत.
दादरमधील वाढत्या फेरीवाल्याची समस्या लक्षात घेता पादचाऱ्यांना विना अडथळा चालता यावा याकरता केशवसूत उड्डाणपूलाखाली बोलार्ड बसवण्यात येत आहेत. केशवसूत उड्डाणपूलाखालील गाळा क्रमांक ०१मध्ये बोलार्ड बसवले जात आहेत. हे काम प्रायोगिक तत्वावर करण्यात होत आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य गाळ्यांमध्ये अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. - विनायक विसपुते, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग)