मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) विदीप दिलीप जाधव यांना त्यांच्या मूळ गावी सातारा येथे काल रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.
बारामतीत बुधवारी कोसळलेल्या चार्टर्ड विमानात विदीप जाधव यांचा समावेश होता. या दुर्दैवी अपघातात विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
जाधव यांचे पार्थिव गावात पोहोचताच वातावरण करुण झाले. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचित मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी जाधव यांच्या लहान मुलाने मुखाग्नी दिला, त्या क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि कर्तव्यनिष्ठ सुरक्षा रक्षक म्हणून विदीप जाधव ओळखले जात होते. आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.