१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प
गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून (दि. २८ जानेवारी) सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेला संयुक्तपणे संबोधित करतील. या अभिभाषणातून केंद्र सरकारच्या आजवरच्या कार्यकाळाचा आढावा तसेच आगामी काळातील धोरणात्मक दिशा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्यावरील धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येईल. गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. या सर्वेक्षणातून देशाची आर्थिक स्थिती, विकासदर, रोजगार, महागाई आणि विविध क्षेत्रांतील कामगिरींचे चित्र समोर येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानिमित्त सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावे होणार आहे.
१३ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशनाचा पहिला टप्पा
२८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पावरही सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर काही दिवसांची विश्रांती असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिलपर्यंत चालेल.