मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणारे भाविक क्रुझर गाडीने मंगळवेढा मार्गे जात होते. याच दरम्यान ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने भरधाव वेगात व चुकीच्या दिशेने येत क्रुझर जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता आणि सविता गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली यादव, सोहम घुगे यांच्यासह इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक hh ४६ bu-६६५१ असून चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.