भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेत निवडून आलेले एकमेव अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक अनिल भोसले स्वगृही परतले आहेत. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीदरम्यान त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याचवेळी भाजपच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपने २२ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली होती. त्यामध्ये काशी मिरा येथील प्रभाग क्रमांक १४ चे माजी नगरसेवक भोसले यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, २०१७ च्या निवडणुकीतही भोसले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र त्यावेळी त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
यावेळीही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवार मीरा देवी यादव यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. प्रचारादरम्यान पक्षाच्या नावाचा वापर केल्याचा आरोप ठेवत भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन केले होते. निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी आपण भाजपसोबतच जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांसोबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करत भाजपला अधिकृत पाठिंबा दिला.
“मी मूळचा भाजपचाच आहे. नागरिकांची कामे प्रभावीपणे करता यावीत, यासाठी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे अनिल त्यांनी सांगितले. भोसलेंच्या पाठिंब्यामुळे मीरा–भाईंदर महापालिकेत भाजपचे संख्याबळ ७९ वर पोहोचले असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.