फोडाफोडीचे राजकारण; भाजप-शिवसेनेचा बचावात्मक उपाय
उल्हासनगर : महापौरपदासाठी उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनीच खबरदारी घेतली असून, ‘फोडाफोडी’च्या भीतीने काही नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलविण्याच्या चर्चाही सुरू आहेत. महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून त्यापैकी भाजपकडे ३७ आणि शिंदेसेनेकडे ३६ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी ४० हा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक आहे.
शिवसेनेने महापौरपदासाठी वंचित बहुजन आघाडी (२ जागा), साई पक्ष (१ जागा) आणि अपक्ष (१ जागा) यांचा पाठिंबा मिळवून ४० नगरसेवकांचा आधार मिळविला आहे. शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला आहे. मात्र, भाजपकडूनही पडद्यामागे सक्रिय हालचाली सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून, दोन्ही पक्षांतून नगरसेवकांना स्थिर ठेवण्यासाठी तणावग्रस्त वातावरण सुरू आहे.