नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले असून, नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे आपल्या पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी थेट नाशिकमध्ये येऊन तपास सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
या कथित लुटीप्रकरणी सध्या पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही लूट नेमकी कशी झाली, ट्रक कुठून निघाला आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. नाशिक आणि बेळगाव पोलिसांमधील समन्वयातून सुरू असलेल्या तपासामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले असून, त्याला अधिकृत उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच गडद झाले आहे.
दरम्यान, या कथित लुटीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ४०० कोटी रुपयांच्या नोटांमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबांचा’ हात असल्याची कुजबूज सुरू आहे. या प्रकरणाची दखल मुंबई पोलीस मुख्यालयात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.