काँग्रेसच्या हातून महापौरपद थोडक्यात हुकणार?
भिवंडी : भिवंडी–निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने शुक्रवारी नगरसेवकांची बैठक घेऊन महापौरपदाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काही खास ‘राजकीय खेळी’ खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पष्ट बहुमत नसल्याने येत्या काही दिवसांत नगरसेवकांची फोडाफोडी आणि अर्थकारणाला ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ९० जागांच्या सभागृहात काँग्रेसने सर्वाधिक ३० जागा पटकावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांकडे मिळून ४२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे भाजपने २२, तर शिवसेनेने १२ जागा जिंकत महायुतीचे एकूण संख्याबळ ३४ वर पोहोचले आहे. महापौर निवडीसाठी आवश्यक असलेल्या ४६ नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्ष व छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. समाजवादी पक्षाचे ६, कोणार्क विकास आघाडीचे ४, भिवंडी विकास आघाडीचे ३ आणि एका अपक्ष नगरसेवकामुळे सत्तासमीकरणे आणखी गुंतागुंतीची
झाली आहेत.
भिवंडीच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेले कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांची भूमिका यंदाही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यांच्या एका निर्णयाने सत्तेचे पारडे कोणत्या बाजूला झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील कार्यकाळात काँग्रेसकडे बहुमत असतानाही विलास पाटील यांच्या रणनीतीमुळे प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. यंदा मात्र ‘काँग्रेसचाच महापौर बसेल,’ असा दावा स्थानिक नेते करत असतानाच भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.