जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात


मुंबई : महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मर्यादित जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठी सुमारे १३ हजार उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी एका जागेसाठी दहा ते पंधरा उमेदवार रिंगणात असल्याने बहुकोनी लढती होण्याची शक्यता आहे.


कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७२ अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या १०० जागांसाठी तब्बल ४४१ उमेदवार मैदानात उतरले आहेत. लोकसंख्या तुलनेने कमी आणि राजकीय क्षेत्र मर्यादित असतानाही अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि ग्रामपातळीवरील राजकारणामुळे येथे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.


रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ अर्ज तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले आहेत. काही तालुक्यांमध्ये एका जागेसाठी सहा ते आठ उमेदवार रिंगणात असून, पारंपरिक राजकीय पक्षांसह नव्या चेहऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरले आहेत.


पश्चिम महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पुण्यात जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी ८५३ अर्ज तर पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १ हजार ४८२ अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी सर्वाधिक ९०७ अर्ज आले असून, पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी १ हजार ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी ९६७ अर्ज आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी १ हजार ३६० अर्ज दाखल झाल्याने तेथेही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.


सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही अर्जांची संख्या मोठी असून, अनेक ठिकाणी थेट लढतीऐवजी बहुकोनी संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे लातूर, परभणी आणि रायगड जिल्ह्यांत अर्ज अपेक्षेपेक्षा जास्त दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारांसमोर यंदा मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल काय लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२७ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार


राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे. २७ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

Comments
Add Comment

डोंबिवलीच्या रीलस्टारच्या घरात सापडला मोठा शस्त्रसाठा

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या दावडी परिसरात राहणाऱ्या रीलस्टार सुरेंद्र पाटीलच्या घरातून कल्याण

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची

Akola Crime : अकोल्यात वर्दीला काळिमा फासणारी घटना; कोठडीतल्या महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

अकोला : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीदवाक्य, ज्याचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला आहे.