नवीन आणि तरुण चेहऱ्याची चर्चा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) सत्ता मिळाली नसली तरीही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदावर बसावे लागणार आहे. राज्यात उपमुख्यमंत्री असण्याचा फायदा असूनही, महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका पुन्हा निभावावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण उभा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवेळी त्याच अनुभवी चेहऱ्याला विरोधी पक्षनेतेपद देण्याऐवजी यंदा नवीन आणि तरुण चेहरा देण्याची चर्चा पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे. या निर्णयाने शिवसेनेला नव्या पिढीची ताकद दाखवण्याची संधी मिळेल, असा पक्षाचा अंदाज आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण जिंकणार?
विरोधी पक्षनेतेपदासाठी मनोज हळदणकर, विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, किशोर पाटकर, शिवराम पाटील हे ज्येष्ठ नगरसेवक पुढे आहेत. त्यात विजय चौगुले यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांनी दोन पॅनेल निवडून ठेवल्याचेही चर्चा आहे.
महिला विरोधी पक्षनेतेची शक्यता?
बेलापूर विधानसभा मतदारसंघात १४ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपद पुरुष नगरसेवकांनीच सांभाळले आहे. सरोज पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाची महिला नेत्यांमधून पहिला पायंडा पाडला होता. आता तरुण विरोधी पक्षनेतेची निवड झाली तर शिवसेना सर्वांसमोर नवा आदर्श ठेवू शकते; परंतु तो नगरसेवक राजकीय प्रगल्भता असलेला असावा, अशी मागणीही आहे.
नवी मुंबई महापालिकेत १९९४ पासून विरोधी पक्षनेते म्हणून पुढील नेते राहिले:
डी. आर. पाटील, पंढरीनाथ पाटील, रमाकांत म्हात्रे, नामदेव भगत, दिलीप घोडेकर, दशरथ भगत, मनोज हळदणकर, विजयानंद माने, सरोज पाटील, विजय चौगुले (शेवटचे विरोधी पक्षनेते).
कुठून येणार विरोधी पक्षनेतेची संधी?
नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी शिवसेनेने १०९ उमेदवार लढवले, त्यापैकी ४२ उमेदवार निवडून आले. सर्वाधिक नगरसेवक ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ऐरोलीमधून २८ जागांपैकी २० नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद ऐरोलीला मिळण्याची शक्यता आहे; परंतु विरोधी पक्षनेतेपद ज्येष्ठ नगरसेवकांना देण्याऐवजी नवा चेहरा देण्याची मागणी पक्षांमध्ये वाढत आहे. जर हा चेहरा तरुण असेल, तर शिवसेनेला पुढील राजकारणासाठी नवी दिशा मिळू शकते.