मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि ईव्हीएम (EVM) मशिनची ने-आण सुरक्षितपणे व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी आज, सोमवार १३ जानेवारीपासून शहराच्या विविध भागांत कडक वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजल्यापासूनच अनेक मार्गांवर प्रवेशबंदी किंवा वाहतूक वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निर्बंध केवळ मतदानापुरते मर्यादित नसून, शनिवार १७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. निवडणुकीच्या कामासाठी वापरली जाणारी वाहने, निवडणूक कर्मचारी आणि मशिनरींच्या हालचालींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. या परिस्थितीत प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते ताकद ...
मध्य मुंबईतील सायन पूर्व भागाला या बदलांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वार्ड क्रमांक १७२ ते १८१ मधील निवडणूक साहित्याच्या वितरणाचे केंद्र सायन परिसरात असल्याने, येथील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सायन परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असून, नागरिकांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "निवडणुकीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे. घराबाहेर पडण्यापूर्वी गुगल मॅप किंवा वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवरील अपडेट्स तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे," असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेशबंदी असलेले रस्ते (स्थानिक रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त)
- रस्ता क्रमांक २४-बी, सायन पूर्व : सन स्टोन इमारतीपासून अभिनंदन सहकारी गृहनिर्माण संस्था (प्लॉट क्रमांक १४९) ते किस्मत लाँड्रीपर्यंत
- आर. एल. केळकर मार्ग, सायन पूर्व : सन स्टोन इमारतीपासून भावेश्वर कुंजपर्यंत
- स्वामी वल्लभदास रोड, सायन पूर्व: सन स्टोन इमारतीपासून यशोधन इमारतीपर्यंत
पर्यायी मार्ग कोणते?
कोणतेही ठराविक पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले नसले तरी, प्रवाशांनी सायन-ट्रॉम्बे रोड किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांसारख्या जवळच्या मुख्य मार्गांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाणार आहे.
पश्चिम मुंबईतील वाहतूक निर्बंध
- याशिवाय, पश्चिम मुंबईतील कांदिवली आणि मालाड परिसरातही वाहतूक वळवण्यात आली आहे.
- वसांजी लालजी रोड : मातोश्री झुणका भाकर केंद्रापासून चंद्रेश वाईन शॉपपर्यंत
- बजाज रोड : एसव्ही रोड जंक्शनपासून बजाज शाळेपर्यंत
- बजाज क्रॉस रोड क्रमांक १ : सम्राट बिल्डिंगपासून सुपर शॉपिंग कॉम्प्लेक्स/टॉप-१० शॉपपर्यंत
- मार्वे रोड (माधच्या दिशेने जाणारा उत्तर मार्ग) : कच्च्या रस्त्यापासून बाफिरा जंक्शनपर्यंत
पर्यायी मार्गांचा वापर
- प्रवीण संघवी रोडवरून उजवीकडे वळून नेहरू रोडमार्गे एसव्ही रोडवर जा
- नारायण जोशी रोडवरून डावीकडे वळून स्टेशन परिसर आणि दळवी रोडमार्गे एसव्ही रोड गाठा
- मार्वे रोडच्या दक्षिण दिशेकडील मार्गाचा वापर करा
- वाहतूक निर्बंधांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.