पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक हृदयपिळवणारा भीषण अपघात झाला.यामध्ये ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्दैवी दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांसह आठ जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील असतोस कामगारांची एक टोळी कर्नाटकातून आपले काम संपवून ट्रॅक्टरने आपल्या मूळ गावी परतत होती. रात्री साडेआठच्या सुमारास हा ट्रॅक्टर चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर आला असता, समोरून येणाऱ्या कंटेनरशी त्याची धडक झाली. यावेळी दोन्ही वाहनांचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.
ट्रॅक्टरमध्ये एकूण नऊ लोक प्रवास करत होते, तर कंटेनरमध्ये दोन लोक होते. हे सर्वजण वाहनांसह पुलाखाली कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात हा अपघात झाल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात महादेव दिलीप काळे (वय ५०) आणि राजू रमेश चव्हाण (वय ४०) या दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ८ आणि ४ वर्षांच्या दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मण राजेंद्र चव्हाण (३८), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (४५), अनिता भारत काळे (१९), विनोद सुखदेव गोमटे (३०), नाना हनुमंत काळे (३२), देवांगी राजेंद्र चव्हाण (८), गुड्डन राजेंद्र चव्हाण (४) आणि ब्रिजेश कुमार (३५) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.
हे सर्व मजूर करकंब गावातील रहिवासी होते. पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकला गेलेली ही टोळी घरापासून काही अंतरावरच होती. अशात त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामुळे करकंब गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.