भाजपाने दिली सर्वाधिक माजी नगरसेवकांना संधी
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात तब्बल १७०० उमेदवार असून त्यात तब्बल १४४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या माजी नगरसेवकांमध्ये भाजपाच्यावतीने सर्वाधिक म्हणजे ५८ माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. त्याखालोखाल उबाठाने ३९ आणि शिवसेनेने ३७ माजी नगरसेवकांना संधी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरुणांना यंदा संधी दिली जाईल अशाप्रकारची घोषणा सर्वच पक्षांच्यावतीने करण्यात आली होती. त्यातच काहींचे प्रभाग आरक्षित झाल्याने तसेच काहींचे वय झाल्याने बाजुला करत अनेक पक्षांनी काही माजी नगरसेवकांचे पत्ते कापले आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येतानाच महापालिकेच्या संसदीय कामकाजाची माहिती असणाऱ्या जुन्या जाणत्या आणि माजी अनुभवी नगरसेवकांचीही सभागृहात गरज असते. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर माजी नगरसेवकांना संधी देवून उर्वरीत जागांवर नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असते. परंतु यंदा बहुतांशी पक्षांनी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली असून त्यात माजी नगरसेवकांचा समावेश केवळ २५ ते ३५ टक्के एवढाच असल्याचेच दिसून येत आहे
भाजपाला मागील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळत त्यांचे ८२नगरसेवक निवडून आले होते. पण मागील वेळेस निवडून आलेले आणि त्यापूर्वी निवडून आलेले अशाप्रकारे केवळ ५८ माजी नगरसेवकांना भाजपाने संधी दिली आहे. त्यामुळे बाकीच्यांना आरक्षण आणि इतर कारणांमुळे घरी बसवून पक्षाचे काम करायला भाग पाडले आहे. तर उबाठाने १६५ जागा लढवताना केवळ केवळ ३९ माजी नगरसेवकांना संधी दिली आहे. तर अनेकांचे पत्ते कापले. तर शिवसेनेकडे उबाठातून गेलेले सन २०१७मध्ये निवडून आलेले आणि त्यापूर्वी निवडून आलेल्या ३७ माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.
माजी नगरसेवकांना अशाप्रकारे दिली संधी
भाजपा : ५८
शिवसेना : ३७
उबाठा : ३९
मनसे : ०१
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) : ०१
राष्ट्रवादी काँग्रेस, अभासे, अपक्ष व इतर : ०८