उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही. ही निवडणूक पूर्णपणे निर्भय, पारदर्शक आणि लोकशाही मार्गानेच पार पडली पाहिजे, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून, प्रमुख नेत्यांचे शहरागणिक दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो प्रथम ठाण्यात तर त्यानंतर नवी मुंबईत पार पडला. या रोड शोदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “कुणाचीही गुंडागिरी, दादागिरी, पैसे वाटप खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.” तसेच पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, “ही निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होता कामा नये. निवडणुका येतील-जातील, पण कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.” “कुठल्याही दबावाखाली कोणतेही काम होता कामा नये. निवडणुका निर्भयपणे आणि लोकशाही मूल्यांनुसारच झाल्या पाहिजेत,” असे स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.