काँग्रेसचे १२ नगरसेवक निलंबित
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. भाजपला साथ देणाऱ्या १२ नगरसेवकांचा आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केल्याने संतापलेल्या काँग्रेसने या १२ नगरसेवकांचे थेट निलंबन केले आहे. पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवताच हे सर्व नगरसेवक आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच हाती कमळ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथच्या सत्तेत मोठी उलथापालथ होणार आहे.
भाजपसोबत युती करणे काँग्रेसच्या नगरसेवकांना महागात पडले आहे. अंबरनाथ नगर परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपच्या १४ नगरसेवकांसोबत युती केली होती. तसा गटही त्यांनी स्थापन केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली असून, त्यांच्या कार्यकारिणीलाही निलंबित केले आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती देण्यात आली.
अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर काँग्रेस शहरातील तिसरा मोठा पक्ष बनला. या ठिकाणी भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले, तर नगराध्यक्ष पदावरही भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाला. शिंदेंची शिवसेना हा २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाकडे निकालानंतर युतीचा हात पुढे केला. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठकही घेतली. मात्र त्यानतंरही भाजपने शिवसेनेला युतीपासून दूर ठेवले, तर देशभरात ज्या काँग्रेसला संपवण्यासाठी नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतचे नेते घोषणा करतात, त्याच काँग्रेससोबत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी युती केली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. मात्र शिवसेनेले दूर ठेवले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
अंबरनाथच्या राजकारणाला नवे वळण
काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकारणाची दिशा बदलणार आहे. ज्या नगरसेवकांनी विरोधात निवडणूक लढवली, तेच आता भाजपच्या झेंड्याखाली येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद किती उरणार आणि भाजपला या नगरसेवकांच्या प्रवेशाने किती फायदा होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
भाजपमध्ये करणार प्रवेश?
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या कारवाईचे पत्र जारी केले आहे. पक्षात राहून भाजपला साथ देणे या नगरसेवकांना महागात पडले असले, तरी आता त्यांनी आपला मोर्चा पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगामी सभेत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे.
- अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजपचे १५ आणि काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या ४ सदस्यांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आणि सत्तेचे गणित जुळवले. या विचित्र युतीमुळे २८ नगरसेवक असूनही शिंदे गटाला सत्तेपासून लांब राहावे लागले होते. आता या नगरसेवकांना निलंबित करून काँग्रेसने कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात भाजपचे संख्याबळ वाढणार असल्याचे दिसत आहे.