पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या भीषण आक्रमणाला आता एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि भावनिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी सोमनाथ मंदिराचे वैभव, भारताची सांस्कृतिक जिद्द आणि परकीय आक्रमकांच्या क्रूरतेचा आढावा घेतला आहे. पंतप्रधानांनी आपल्या लेखात सोमनाथ मंदिराचे वर्णन 'भारताच्या आत्म्याचा शाश्वत अवतार' असे केले आहे. प्रभास पाटण येथे वसलेले हे मंदिर केवळ एक वास्तू नसून भारताच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रममध्ये सोमनाथचे स्थान अग्रक्रमी असून, भारतातील १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी इतिहासातील त्या काळ्या कालखंडाचा उल्लेख केला, जेव्हा जानेवारी १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने सोमनाथवर भीषण हल्ला केला होता. "या क्रूर आणि हिंसक हल्ल्याचा एकमेव उद्देश श्रद्धा आणि सभ्यतेचे महान प्रतीक नष्ट करणे हा होता. आक्रमकांनी हे धार्मिक स्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते," असे पंतप्रधानांनी आपल्या लेखात लिहिले आहे. २०२६ हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण १०२६ मधील त्या पहिल्या आक्रमणाला आता १००० वर्षे पूर्ण होत आहेत. मंदिर कितीही वेळा पाडले गेले तरी भारतीयांची श्रद्धा डगमगली नाही आणि प्रत्येक वेळी मंदिर अधिक वैभवाने उभे राहिले, हे भारताच्या अजेय शक्तीचे दर्शन घडवते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
१००० वर्षांच्या संघर्षानंतरही मंदिर वैभवात उभे
सोमनाथ मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून ते भारताच्या जिद्दीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताज्या लेखात केले आहे. १०२६ मध्ये झालेल्या भीषण आक्रमणाने हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गेल्या एक हजार वर्षांत भारतीय जनतेने हे मंदिर वेळोवेळी अधिक वैभवशाली पद्धतीने उभे केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या लेखात एक महत्त्वाचा योगायोग अधोरेखित केला आहे. २०२६ हे वर्ष सोमनाथ मंदिरासाठी दुहेरी ऐतिहासिक महत्त्व घेऊन येत आहे. एका बाजूला मंदिरावरील पहिल्या आक्रमणाला १००० वर्षे पूर्ण होत असतानाच, दुसऱ्या बाजूला स्वतंत्र भारतातील मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले होते. मंदिराचे सध्याचे भव्य स्वरूप ११ मे १९५१ रोजी पूर्णत्वास आले. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडण्यात आले, अशी आठवण पंतप्रधानांनी करून दिली. पंतप्रधानांच्या मते, सोमनाथ मंदिरावर झालेला हल्ला ही मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक होती. मात्र, मंदिराची वारंवार होणारी पुनर्बांधणी ही भारताच्या सांस्कृतिक विजयाची साक्ष देते. "आक्रमकांनी वास्तू पाडली, पण ते इथल्या लोकांची श्रद्धा चिरडू शकले नाहीत. आज १ हजार वर्षांनंतरही सोमनाथ मंदिर आपल्या पूर्ण वैभवात उभे राहून जगाला शांतता आणि शक्तीचा संदेश देत आहे," असे मोदींनी आपल्या लेखात म्हटले आहे.
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे ...
"सोमनाथची कहाणी विनाशाची नाही, तर कोटींच्या स्वाभिमानाची!
"सोमनाथची कहाणी ही केवळ विनाशाची कथा नसून ती भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अस्मितेची आणि अढळ श्रद्धेची यशोगाथा आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या लेखात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. "ज्या काळात सोमनाथवर आक्रमण झाले, त्या क्रूरतेचा भारतीय जनतेच्या आणि देशाच्या मनोबलावर किती खोलवर परिणाम झाला असेल, याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही," असे त्यांनी नमूद केले. सोमनाथ हे केवळ मंदिर नव्हते, तर ते त्या काळातील मजबूत आर्थिक आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राचीन काळी सोमनाथ मंदिराचे वैभव इतके अफाट होते की, भारताचे सागरी व्यापारी आणि खलाशी या मंदिराच्या कथा दूरवरच्या देशांत घेऊन जात असत. हे मंदिर समाजासाठी एक मोठी प्रेरणा होती. परकीय आक्रमकांनी हेच वैभव आणि भारतीयांची प्रेरणा नष्ट करण्यासाठी सोमनाथला लक्ष्य केले होते, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "दीर्घकाळ सोसलेली गुलामगिरी आणि मंदिरावर झालेले वार असूनही, आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की सोमनाथ आजही दिमाखात उभे आहे," असे मोदींनी लिहिले. त्यांच्या मते, गेल्या १००० वर्षांपासून सुरू असलेला हा प्रवास विनाशाचा नसून तो भारतीय मूल्यांच्या जपणुकीचा आहे. आक्रमक आले आणि गेले, पण भारताची श्रद्धा आजही तितकीच पवित्र आणि मजबूत आहे, हाच संदेश सोमनाथच्या अस्तित्वातून जगाला मिळतो.
मंदिरे म्हणजे केवळ दगडी वास्तू नव्हे, तर 'राष्ट्रीय जीवनशक्ती'
"भारताची प्राचीन मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती ज्ञानाचे महासागर आहेत. कोणत्याही पुस्तकापेक्षा ही मंदिरे तुम्हाला आपल्या महान संस्कृतीची सखोल समज देतील," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वारशाचा गौरव केला आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे आणि सोमनाथसारखी ज्योतिर्लिंगे ही ज्ञानाचे असंख्य धडे शिकवणारी विद्यापीठेच आहेत. सोमनाथसह अनेक मंदिरांवर परकीय आक्रमणांच्या शेकडो जखमा आहेत. "ही मंदिरे वारंवार उद्ध्वस्त करण्यात आली, पण प्रत्येक वेळी ती आपल्याच भग्न अवशेषांमधून अधिक वैभवशाली आणि मजबूत होऊन पुन्हा उभी राहिली. हे केवळ मंदिरांचे पुनरुज्जीवन नाही, तर हीच खरी 'राष्ट्रीय जीवनशक्ती' आणि 'राष्ट्रीय भावना' आहे," असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मंदिरांच्या या वारंवार होणाऱ्या जीर्णोद्धारातून भारतीयांची कधीही न हरण्याची वृत्ती दिसून येते. आक्रमकांनी वास्तू पाडली तरी संस्कृतीचे मूळ उपटता आले नाही, हाच विचार आपल्याला राष्ट्रीय अभिमान देतो. या वारशाचे जतन करणे आणि त्याचे अनुसरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे आवाहनही पंतप्रधानांनी या निमित्ताने केले आहे.