मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ९५ मधील शेखर वायंगणकर यांना अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे त्यांच्यासह २६ बंडखोरांची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांनी मातोश्रीवर मध्यरात्री जोरदार राडा घातला होता. २८ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या बैठकीत प्रभाग ९५ च्या उमेदवारीवरून वाद पेटला. अनिल परब यांनी आपला विश्वासू कार्यकर्ता शेखर वायंगणकर याला तिकीट देण्याची जोरदार मागणी केली होती.
मात्र, स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या शिफारशीवरून दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयाला अनिल परब यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत सरदेसाई यांनी मध्ये तोंड घालताच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, अनिल परब संतापून बैठक सोडून बाहेर पडले. शेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेतल्याने पक्षाने इतर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला.