सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ८६ लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
समुद्राच्या सततच्या लाटांमुळे आणि नैसर्गिक झिजेमुळे दर्या बुरुजाच्या तटबंदीचा काही भाग कमकुवत झाला होता. तसेच भिंतीखाली अंडरकट पोकळी निर्माण झाली होती. ही ऐतिहासिक रचना जतन करण्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपी अंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उप मंडळामार्फत काम राबवले जाणार आहे.
सदर आरसीपीला पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांनी मान्यता दिली आहे. विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचा कणा मानला जातो. अशा ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही याचा मोठा फायदा होणार आहे.