मुंबई : हिरव्या मतांची गुलामी करणाऱ्या संजय राऊत यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी खडे बोल सुनावले. स्वतःच्या खासदारकीसाठी राऊतांनी पक्षच काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे, असे नवनाथ बन म्हणाले. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन नवनवे आरोप करत असतात. पण एकही आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे ते देत नाहीत. उबाठाने उमेदवारी देताना, एबी फॉर्म देताना किती पैसे घेतले याची माहिती आमच्याकडे आहे ; या शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊतांना सुनावले.
राऊतांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडते. अजित पवारांवर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. पण पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सध्या जामिनावर आहेत. खटला सुरू आहे. या स्थितीत राऊतांनी प्रामाणिकपणावर बोलू नये, असे बन म्हणाले.
वॉशिंग पावडर आमच्याकडे आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही पारदर्शकता आणण्याचं काम करत आहोत. त्यांची कारकिर्द काळ्या कोळश्यासारखी आहे; यांच्याकडे काळ्या कोळश्याची पावडर आहे, असे नवनाथ बन म्हणाले.
आरोपांची चौकशी होणार
भाजपातील कोणावरही गंभीर आरोप झाल्यास संबंधितांची चौकशी होते. कोणाचीही चौकशी थांबवलेली नाही. महापालिकांच्या निवडणुका म्हणजे सामान्यांच्या निवडणुका. या निवडणुकीतही आमचे नेते सहभागी झाले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या विजयासाठी प्रचार करत आहेत.
...तर दोषींना शिक्षा होईल
जर एखाद्या गुन्ह्यात भाजपशी संबंधित व्यक्ती आढळली असेल तर गय केली जाणार नाही. कायद्यानुसार कावाई होईल. दोषींना सवलत मिळणार नाही, अशी ग्वाही नवनाथ बन यांनी दिली.