नाशिकमध्ये रंगणार तिरंगी लढत

धनंजय बोडके

गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वाधिक प्रस्थ असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्येदेखील इथे भाजपने राज्यात चांगलीच मुसंडी मारली. त्याला अपवाद नाशिक जिल्हा ठरला असून शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे. महानगरपालिकेमध्येदेखील एकहाती सत्ता अर्थात १०० प्लसचा नारा भाजपने दिला.


उमेदवारी एबी फॉर्म मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी भाजप, सेना, काँग्रेसमधील घमासान राज्यभर गाजले. त्यामुळे भाजपासह शिंदे सेना, अजितपवार यांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीत पुढील १५ दिवस आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडणार आहे. राज्यात कोणाशीही युती न करता भाजपने १४ महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यात नाशिक महानगरपालिकेचाही समावेश आहे. भाजपची उमेदवारी मिळेल म्हणून सुमारे १०७७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता असताना १२२ जागांमध्ये चांगल्या व अनुभवी लोकांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते; परंतु कार्यकर्त्यांना डावलून नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या ३३ आयारामांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे सुमारे २२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. त्यामुळे नाशिक शहरात तिकीट वाटपावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन युती करत १३५ ठिकाणी उमेदवार उभे केले. तर तिसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा ८२, मनसे ३४, काँग्रेस २२ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३१ जागांवर निवडणूक लढविणार आहे.


खरे म्हणजे आमदार-खासदारांच्या आप्तस्वकीयांना तिकिटे आणि घराणेशाहीला थारा नको म्हणणाऱ्या भाजपचे नाशिकमध्ये भलतेच धोरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागा असताना इच्छुकांची संख्या हजारावर पोहोचल्याचा दावा करणाऱ्या या पक्षाने अनेक निष्ठावंतांना ‘कात्रजचा घाट’ दाखवताना दुसरीकडे मात्र तीन परिवारांसाठी नियमोल्लंघन करीत प्रत्येकी दोन उमेदवार देण्याचे दातृत्व दाखवले. विशेष म्हणजे, स्थानिक आमदारांना थेट विरोध केलेल्यांना टाकलेले हे ‘रेड कार्पेट’ निष्ठावंतांना बुचकळ्यात टाकणारे आहे. नाशिक महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपने विविध प्रकारची रणनीती अवलंबली. पक्षात आता हाउसफुल’चा बोर्ड लावण्याची वेळ आलीय म्हणणारे मंत्री गिरीश महाजन यांना मात्र उमेदवारी बहाल करताना निर्माण झालेला असमतोल ध्यानी आला नाही. सतीश सोनवणे, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रशांत जाधव या निष्ठावंत मंडळीसह इतर पक्षातून येताना ‘शब्द’ दिलेल्या अनेकांना उमेदवारी यादीतून डावलण्यात आले. मात्र, शहरातील तीन परिवारांतील प्रत्येकी दोघांना उमेदवारी देवून पक्षाने अनेकांची ‘उमेद’ घालवली. काही प्रभागातील प्राबल्य पाहून भाजपने काहींना काही महिने आधी तर काहीना ऐनवेळी समाविष्ट करून घेत उमेदवारी देण्याचे सोपस्कार पार पडले. महापालिका निवडणुका तब्बल आठ वर्षांनी होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून भाजप प्रवेशाची भरती आली. ती निवडणुका जाहीर झाल्यांनतरही कायम राहिल्याने पक्षातील निष्ठावानांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात विनायक पांडे आणि शाहू खैरे यांचा प्रवेश निष्ठावानांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही एबी फॉर्म मिळावा यासाठी प्रचंड राडा झाला. शेवटच्या दिवशी इच्छुकांनी एबी फॉर्म मिळावा यासाठी चांगलीच धावपळ केल्याचे चित्र आहे. मात्र, आयारामांना संधी आणि निष्ठावानांची कोंडी झाल्याचे चित्र असल्याने भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी न मिळाल्याने असंतोष निर्माण झाल्याने बंडखोरी अधिक होण्याची शक्यता आहे.


अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगणार असून, त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यासुद्धा या ताफ्यामध्ये होत्या. यानंतर भाजपकडून पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी एबी फॉर्म न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच उमेदवारी न मिळालेल्या इतर इच्छुकांनीही नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना काही मोजक्याच इच्छुकांना ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तिकीट वाटप सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली होती. तसेच, कारागृहात असलेल्या भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनीदेखील अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने शड्डू ठोकलाय. आता नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला आता १०० प्लस साठी पक्षांतर्गत नाराजी प्रथम दूर करावी लागणार आहे, तर विकासाची मुद्दे घराघरात पोहोचवावी लागणार आहे. शिंदे सेनेलाही चांगली झुंज द्यावी लागेल, तर महाविकास आघाडीचीही मोठी परीक्षा आहे.

Comments
Add Comment

पुलांच्या बांधकामात तंत्रज्ञानाचा समन्वय

मुंबईचा एल्फिन्स्टन पूल हा केवळ लोखंड आणि दगडांचा ढाचा नव्हता, तर शहराच्या प्रगतीचा साक्षीदार होता. नव्या

बारामतीची कमान कोणाकडे?

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र बारामतीमध्ये आता वारसाहक्काच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार

मायेचा जिव्हाळा जपणारी गावाकडची माणसं

धावपळीच्या आयुष्यात हरवलेला माणूस जेव्हा थकून जातो, तेव्हा त्याला आठवण येते ती आपल्या गावच्या मातीची आणि

Amravati Paratwada परतवाड्यात मैत्रीआडून भयंकर अत्याचार

वार्तापत्र : विदर्भ  अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे गेल्या तीन आठवड्यांपासून महिलांवरील कथित लैंगिक

हंगेरीतील सत्तांतराचा अमेरिकेला धक्का

ऑर्बन यांनी विरोधकांना व्यक्ती म्हणून नव्हे, तर व्यवस्था म्हणून उभे केले. ते केवळ युरोपियन महासंघाचे केंद्र

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाकडे

वार्तापत्र : मराठवाडा  अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता