पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान कापला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. संक्रात हा सण जवळ आला असून पालघर शहर व परिसरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून नायलॉन व चायनीज मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहनचालकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत अशा मांज्यांमुळे किरकोळ व गंभीर जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पूल, मुख्य रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी पतंगाची मांज्या अचानक गळ्यात, हाताला किंवा चेहऱ्यावर अडकून अपघात घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे पालघर नगर परिषद, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन चायनीज मांज्यावर कडक बंदीची अंमलबजावणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.