काँग्रेसचा स्वबळाचा नारा
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून समाधान न झाल्याने काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे यांच्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावरून मतभेद वाढले.
काँग्रेसने ३५ जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला केवळ पाच ते सहा जागा देण्यास तयार होते. हा प्रस्ताव अमान्य करत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आघाडीतून बाहेर पडण्याची आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
चव्हाण म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, ज्यावेळी आम्ही आघाडीसोबत उभे होतो, तेव्हा आज जवळचे मानले जाणारे काही पक्ष विरोधकांसोबत होते. आता काँग्रेसकडे सर्व प्रभागांसाठी सक्षम उमेदवार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील.” वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, “विक्रांत चव्हाण यांनी नेमकी काय घोषणा केली याची माहिती घेतली जाईल. काही गैरसमज असतील तर आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट ढासळली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे राहणार की आघाडीतील फूट त्यांना फायदेशीर ठरणार, हे काळकच ठरवेल.