युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम
भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अद्याप ठोस दिशा मिळालेली नाही. रविवारी सकाळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करूनही युतीबाबत निर्णय न झाल्याने, आता शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत भाजपकडून स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना स्वतंत्र निर्णय घेईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, ''दोन दिवसांपूर्वी मीरा–भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेत सन्मानपूर्वक तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर मेहता यांच्याकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही'', असा दावाही त्यांनी केला. सरनाईक यांनी भाजपकडून मांडण्यात आलेल्या अटींवरही आक्षेप घेतला. “टाउन पार्कची जागा २००४ साली महापालिकेच्या ठरावाद्वारे ठेकेदाराला देण्यात आली होती. त्या ठरावावर नरेंद्र मेहता यांचीही सही आहे. त्यामुळे २१ वर्षांनंतर हा विषय उपस्थित करणे योग्य नाही आणि त्याचा सेना–भाजप युतीशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपने घातलेल्या दुसऱ्या अटीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत परत पाठवण्यास आम्ही तयार आहोत; मात्र भाजपनेही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले चार नगरसेवक शिवसेनेत परत पाठवावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी भाजप–शिवसेना युती होत असताना मीरा–भाईंदरमध्ये अद्याप कोणतीही प्रगती होत नसल्याचे नमूद करत, सरनाईक म्हणाले की, याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी युतीविषयी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून कळवतो, असे सांगितले असून त्यांचा प्रतिसाद २४ तासांत अपेक्षित आहे. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत भाजपच्या उत्तराची प्रतीक्षा करून शिवसेना आपला पुढील निर्णय जाहीर करेल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.