हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह स्टेज शोदरम्यान प्रेक्षकांकडून झालेल्या गैरवर्तनाला तिनं थेट आणि ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
परफॉर्मन्स सुरू असताना काही प्रेक्षकांनी अश्लील कमेंट्स करत स्टेजच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून प्रांजलनं गाणं मध्येच थांबवलं आणि माईक हातात घेऊन संबंधित व्यक्तींना खडेबोल सुनावले.
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रांजल संतप्त अवस्थेत दिसत असून तिनं एका वयोवृद्ध व्यक्तीला उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटलं, “तात्या, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. थोडा तरी विचार करा आणि स्वतःवर ताबा ठेवा.” यानंतर काळं जॅकेट घातलेल्या एका तरुणालाही तिनं सुनावलं. “तोंड काय फिरवतोयस? मी तुलाच सांगतेय. तुमच्याही घरी आई-बहीण आहेतच , हे लक्षात ठेव,” असं ती म्हणताना दिसते.
प्रांजलनं यावेळी संपूर्ण प्रेक्षकांनाही स्पष्ट शब्दांत आवाहन केलं. “आम्ही कलाकार आहोत आणि तुमच्या मनोरंजनासाठी स्टेजवर येतो. याचा अर्थ असा नाही की आमच्याशी गैरवर्तन केलं जावं. आमचा सन्मान ठेवा, सहकार्य करा, तरच आम्ही पुढील परफॉर्मन्स देऊ शकतो,” असं ती म्हणाली.
दरम्यान, प्रांजलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटिझन्स तिच्या धाडसाचं आणि स्पष्ट भूमिकेचं कौतुक करत आहेत. ‘कलाकारांचा आदर करा’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.