डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्र ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खंबाळपाडा भागातील एक जलकुंभाच्या जलवाहिनीमध्ये गळती होत असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जात आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका उल्हासनदीतून पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. मोहिली उदंचन केंद्रातून उचललेले पाणी नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले जाते आणि तेथे शुध्दीकरणानंतर डोंबिवली पूर्व व पश्चिम शहरांना पुरवठा केले जाते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाने अमृत योजना दोन चा टप्पा महापालिका हद्दीत राबविला जात आहे. या योजनेतून खंबाळपाडा भागातील एका उंच जलकुंभाची अंतर्गत जलवाहिका महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आली आहे. या जोडणीच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे गळती अधिक प्रमाणात झाली आहे. या गळतीचे पाणी परिसरात पसरल्याने दुरुस्ती आवश्यक ठरली आहे. मंगळवारी या ठिकाणी नवीन जोडसांधा बसविण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे गळती थांबेल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी म्हणाले. या कालावधीत नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद राहणार आहे.