पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरात सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
या मोहिमेअंतर्गत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळलेल्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट वाहनचालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. शहरातील प्रमुख चौक, महामार्ग तसेच शहराबाहेरील ढाबे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट परिसरातील रस्त्यांवर ही पथके ब्रेथ अॅनालायझर मशिनसह तपासणी करणार आहेत.
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतात. मद्याच्या नशेत वेगाने गाडी चालवल्यामुळे दरवर्षी गंभीर अपघातांच्या घटना घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओची पथके रात्रभर गस्त घालणार आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, रस्ते सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील आकुर्डी परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आलिशान कारमधून सुरू असलेली गांजाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत तब्बल ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४२ लाख रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.