आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीवूड्स सेक्टर ४२ए येथील नीलकंठ प्राईड इमारतीत असलेल्या संगम गोल्ड या सोन्याच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या प्रकारामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी आधी दुकानाची रेकी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर ठरवलेल्या योजनेनुसार चार आरोपी घटनास्थळी दाखल झाले. त्यापैकी तीन आरोपी बुरखा परिधान करून थेट दुकानात शिरले, तर चौथा आरोपी बाहेर थांबून परिसरावर नजर ठेवत होता.


दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचारी आणि ग्राहकांना बंदुकीचा धाक दाखवत गोंधळ उडवला. काही क्षणांतच त्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. अवघ्या काही मिनिटांतच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर दुकानातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची पाहणी करण्यात आली आहे.


तपासासाठी डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.


सीवूड्ससारख्या गजबजलेल्या आणि उच्चभ्रू भागात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी वर्गाकडून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी आणि नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक

Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Bigg Boss Marathi 6 : राखी सावंतनं मर्यादा ओलांडल्या, दीपाली आणि राकेशबाबत केलं 'हे' वक्तव्य

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. याचबरोबर घरात राखी सावंतनं एन्ट्री घेतल्यानंतर

Dhurandhar 2 : अखेर 'धुरंधर २' सिनेमाबाबत दीपिकानं सोडलं मौनं, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली....

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली