मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जंगी सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. "नकली सगळे घरात बसले आहेत आणि असली माझ्या समोर बसले आहेत," अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना डिवचले.
जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ...
'चांदा ते बांदा' शिवसेनेची ताकद वाढली
निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आज आपला पक्ष खऱ्या अर्थाने राज्यभर पोहोचला आहे. चांदा ते बांदापर्यंत धनुष्यबाणाने झेप घेतली आहे. कोकणात तर पूर्णपणे 'वन साईड' निवडणूक झाली असून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. तुम्ही मिळवलेला हा विजय केवळ मोठा नाही, तर ऐतिहासिक आहे. जनतेने कोणाची शिवसेना 'असली' आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे."
"सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!"
सत्तासंघर्ष आणि निवडणूक निकालांचा संदर्भ देत शिंदे पुढे म्हणाले, "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सत्याचा विजय झाला आहे. सांगोला जिल्ह्यात शहाजीबापू पाटील यांनी तर सर्वांनाच आडवे केले आहे." शहाजीबापूंच्या विजयाचा उल्लेख करताच एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
महायुतीची सरशी ; भाजप-शिवसेना ठरले अव्वल
२१ तारखेला जाहीर झालेल्या निकालात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी हे मोठे बळ मानले जात आहे.
कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र
नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे कौतुक करताना शिंदेंनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. "निवडणुका संपल्या आहेत, आता लोकांच्या कामांना प्राधान्य द्या. विकासाच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि हेच सातत्य आपल्याला पुढेही टिकवायचे आहे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.