कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच कित्येक आठवणींचा वारसा लाभलेले भले मोठे आंब्याचे झाड रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली लवकरच तोडले जाणार आहे. हे झाड किऱ्याचा आंबा तथा किरमँगो वृक्ष म्हणून प्रसिद्ध असून, त्याच्या समोरील पटांगण किरमँगो स्टेडियम म्हणून क्रीडाप्रेमींमध्ये सर्वश्रुत आहे.
याच पटांगणाचा साक्षीदार असलेल्या या वृक्षाने या मैदानावर गेली दोन-तीन पिढ्यांमधील खेळाडूंना बागडताना - खेळताना पाहिले आहे, तर शेकडो पक्षी, पादचाऱ्यांना आसरा दिला आहे. रस्ता रुंदीकरणात हे झाड लवकरच तोडण्यात येणार असल्याचे समजते. महाराष्ट्र झाड संरक्षण आणि जतन कायदा २०२१ प्रमाणे महाराष्ट्र सरकारने ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या झाडांना वारसा वृक्ष-हेरिटेज ट्री म्हणून दर्जा दिला आहे. अशा झाडांची कत्तल करणे हा गंभीर गुन्हा असून, त्यासाठी कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाईची तरतूद केली आहे. मात्र, झाडे तोडणारा ठेकेदार सरसकट सगळी झाडे कापत चालला आहे. या गोष्टीची ठेकेदाराने दखल घेणे अत्यावश्यक आहे.
नांदगाव ते फोंडा तिठा आणि घाट रस्त्याच्या कडेला असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे वड, पिंपळ, आंबा अशी मोठमोठी झाडे तोडून, कापून त्याची ठेकेदाराने विल्हेवाट लावली आहे, तर झाडांची फांद्या, पाने लगतच्या कब्जेदाराच्या जागेत टाकली आहेत.
त्यांना त्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे. विकासाच्या उंबरठ्यावर जिल्ह्याच्या वेशीवरील फोंडाघाट हे गाव आहे. देवगड ते हैदराबाद महामार्गाचा हजारो कोटी रुपयांच्या विकासाचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे.