अहमदाबाद : आगामी २०२६ टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) येत्या शनिवारी, २० डिसेंबर रोजी टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर निवड समितीची बैठक होऊन वर्ल्ड कपचे तिकीट मिळवणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली जातील. या संघ घोषणेचे वैशिष्ट्य म्हणजे, टीम इंडियाला वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ही मालिका २१ ते ३१ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे निवड समिती न्यूझीलंड मालिका आणि टी२० वर्ल्ड कप या दोन्ही महत्त्वाच्या मोहिमांसाठी एकाच वेळी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे खेळाडूंना वर्ल्ड कपच्या दृष्टीने न्यूझीलंड मालिकेमध्ये सराव करण्याची मोठी संधी मिळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होणारा हा मेगा टी२० वर्ल्ड कप ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून, या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाईल. घरच्या मैदानावर हा वर्ल्ड कप होणार असल्याने भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसोबतच कोणत्या युवा चेहऱ्यांना संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मुंबई : भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत ...
२०२६ च्या टी२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संभाव्य १५ शिलेदारांची निवड करताना निवड समितीसमोर मोठे पेच उभे राहिले आहेत. भारतीय संघ सध्या सातत्याने विजय मिळवत असला, तरी काही प्रमुख खेळाडूंचा वैयक्तिक फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे.
१. कर्णधार आणि उपकर्णधाराचा फॉर्म चिंतेत : संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव कडेच राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, २०२५ हे वर्ष सूर्यासाठी बॅटने अत्यंत खराब गेले आहे. २० सामन्यांत केवळ १४.२० च्या सरासरीने २१३ धावा करणाऱ्या सूर्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. हीच अवस्था उपकर्णधार शुबमन गिलची आहे. १५ सामन्यात त्याच्या नावावर केवळ २९१ धावा आहेत. तरीही, त्यांच्या अनुभवामुळे त्यांना वगळण्याचे धाडस निवड समिती दाखवेल असे वाटत नाही.
२. सलामीची जोडी आणि यष्टीरक्षक : सर्वात मोठा बदल सलामीच्या जोडीत दिसू शकतो. अभिषेक शर्मा याने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित केल्यामुळे त्याला शुबमन गिलसोबत सलामीला पाठवले जाऊ शकते. यामुळे यशस्वी जैस्वालला दुर्दैवाने राखीव खेळाडू म्हणून बसावे लागू शकते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे. २०२४ मध्ये तीन शतके ठोकूनही सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर जितेशचा फॉर्मही समाधानकारक नाही.
३. ऑलराउंडर्सवर विश्वास, रिंकू सिंगला धक्का? : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडूंवर अधिक भर देत आहे. यामुळे हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जागा निश्चित मानली जात आहे. मात्र, याचा फटका 'फिनिशर' रिंकू सिंगला बसण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेप्रमाणेच त्याला वर्ल्ड कपमधूनही बाहेर ठेवले जाऊ शकते, जे चाहत्यांसाठी धक्कादायक असेल.
४. गोलंदाजीचे अस्त्र आणि हर्षित राणाची एन्ट्री : भारतीय गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या 'त्रिकुटा'वर असेल. मात्र, वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात हर्षित राणाचे नाव आघाडीवर आहे. गौतम गंभीरचा विश्वासपात्र असलेला हर्षित आपल्या वेगवान आणि भेदक गोलंदाजीमुळे संघात १५ वा खेळाडू म्हणून स्थान मिळवू शकतो.
भारताचा संभाव्य १५ सदस्यांचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा. यष्टीरक्षक: जितेश शर्मा, संजू सॅमसन. ऑलराउंडर: हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर. गोलंदाज: कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.