प्रचाराचा नारळ फुटला!
पालिकेत युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची भूमिका
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा परिसरात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीवरून तणाव वाढताना दिसत आहे. कळवा पूर्व आणि पश्चिम भागातील भाजप मंडळाध्यक्षांनी आज पत्रकार परिषद घेऊन १६ पैकी ८ जागांवर दावा ठोकला. यावेळी युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेसाठी भाजप–शिवसेना युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली, तरी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले असताना युतीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर कळव्यातील भाजपने आक्रमक होत आज (दि. १८) कळवा-खारेगाव-विटावा परिसरातील प्रभाग क्रमांक ९, २३, २४ आणि २५ मध्ये प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक तयारीला सुरुवात केली.
कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे भेट घेतली, तर माजी मंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईत भेट घेऊन त्यांना पत्र दिले. युतीत भाजपला ५० टक्के जागा देण्यात याव्यात, अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी वरिष्ठांना स्पष्ट केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला खांद्याला खांदा लावून मदत केली आहे. कळव्यात गेल्या काही वर्षांत भाजपचे सुमारे १६ हजार सदस्य झाले असून, मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. याच भागातून भाजपचे दोन उपमहापौरही झाले आहेत. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने कळव्यात विकासासाठी भाजपची सत्ता आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे, असा दावाही करण्यात आला.
सध्या कळव्यातील १६ जागांसाठी भाजपकडून ३५ इच्छुक रिंगणात असून, त्यानुसार चारही प्रभागांत प्रचार सुरू करण्यात आला आहे. यावेळी मंडळाध्यक्ष कृष्णा यादव, तेजस चंद्र मोरे यांच्यासह मनोहर सुखदरे, प्रशांत पवार, प्रशांत तलवडेकर, नीता पाटील, हर्षला बुबेरा, सुदर्शन साळवी, मनोज साळवी, अनंत पाटील, जगदीश गौरी, दीनानाथ पांडे, कमलाकर वरबडे, राजन पाटील, ओम जैस्वाल, अरविंद कलवार, हनुमंत शिंघे, बळीराम भोंडेकर, लक्ष्मीकांत यादव, नरेश पवार, ज्ञानेश्वर जमदाडे, दीपिका क्षीरसागर, सुरेश शेवाळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.