पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरची आहे. राजगुरूनगरमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. भर दिवसा हा थरकाप उडवणारा प्रकार घडला.
राजगुरूनगरमधील मांजरेवाडी परिसरात असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास हत्या झाली. दहावीचा वर्ग सुरू होता. शिक्षक शिकवत होते. क्लासचा दहावीचा वर्ग सुरू असताना बेंचवर बसलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील विद्यार्थ्याने अचानक चाकूने हल्ला केला. आरोपी विद्यार्थ्याने गळ्यावर आणि पोटात अनेक वार केल्याने दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. पुरता रक्तबंबाळ झाला. याच अवस्थेत जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, ही घटना खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली असून आरोपी आणि मृत विद्यार्थ्यामध्ये पूर्वी काही वाद होता का, या दृष्टीने तपास केला जात आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने तपास अधिक संवेदनशील पद्धतीने सुरू आहे.
सध्या शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळेत परिसरात पोलीस बंदोबस्त आणि पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय, याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून खासगी कोचिंग क्लासमधील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि विद्यार्थ्यांवर असलेली देखरेख यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पालकांमध्ये भीतीचं वातावरण
या धक्कादायक घटनेनंतर पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. अनेक पालक शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाताना दिसत आहेत. शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करा, क्लासमध्ये कडक नियम लागू करा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकरवी ठोस उपाययोजना करा; अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा आणि क्लासच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या हाणामाऱ्या थांबवण्यासाठीही त्वरित कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.