ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा
ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) २२३.७० कोटींची निविदा जाहीर केली आहे. याअंतर्गत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नागरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट या उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम होणार आहे.
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो २९ किमीची मार्गिका असून त्यावर २२ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात ६ किमीच्या टप्प्यातील ६ स्थानकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण मार्गिकेतील २६ किमी मार्गिका उन्नत स्वरुपाची आहे. रेल्वे स्थानकाजवळील दोन मेट्रो स्थानके भूमिगत असतील. ठाण्यातील वागळे इस्टेट, घोडबंदर, कोलशेत, साकेत, इत्यादी महत्त्वाच्या अंतर्गत भागांना ही मेट्रो जोडेल. यामुळे ठाणेकरांचा अंतर्गत प्रवास सुलभ होणार आहे.
ठाणे मेट्रो मुंबईच्या मेट्रो ४ आणि मेट्रो ५ मार्गिकांना जोडल्यामुळे ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते कल्याण मेट्रो प्रवास शक्य होईल. २०४५ पर्यंत या मेट्रोतून दैनंदिन ८ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त भागीदारीतून उभा राहणारा हा प्रकल्प १२ हजार २०० कोटींचा आहे. हा प्रकल्प ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी शाश्वत, स्वच्छ आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरेल. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, इंधन बचत होईल आणि हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल. विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांसाठी ही मेट्रो जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.