Sunday, January 18, 2026

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा 

मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात उबाठाचे आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आलेला असून तर पाच नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपाचे आहेत. त्यामुळे विलेपार्ले विधानसभेवर महायुतीचा वरचष्मा असून आगामी निवडणुकीत महायुतीचे पाच नगरसेवक किंवा त्यापेक्षा अधिक निवडून येण्याचे पुरक वातावरण दिसून येत आहे. या विधानसभेत उबाठाचा एकमेव नगरसेवक असला तरी मनसेकडून दोन जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. परंतु या दोन जागांपेंकी केवळ एकमेव जागा मनसेच्या वाट्याला जावू शकते,असे बोलले जात आहे.

सन २०१७च्या निवडणुकीत विलेपार्ले विधानसभेतून भाजपाचे तीन, काँग्रेसचे तीन, आणि शिवसेनेचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. परंतु काँग्रेसच्या तीन पैंकी दोन नगरसेवक एक भाजपा आणि एक शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे सध्या भाजपाचे चार, काँग्रेसचा एक, शिवसेनेचा एक, उबाठा एक अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे जगदीश अमिन कुट्टी यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे चार नगरसेवक झाले आहेत, तर सुषमा राय यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचाही या प्रभागात एक नगरसेवक आहे. त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला दोन आणि भाजपाच्या वाट्याला पाच जागा येण्याची शक्यता आहे.

लोकसभा मतदार संघातील विलेपार्ले विधानसभेतील निकाल 

उज्ज्वल निकम (भाजपा) : ९८,३४१

वर्षा गायकवाड (काँग्रेस) : ४७,०१६

विलेपार्ले विधानसभेतील निकाल

पराग अळवणी (भाजपा): ९७,२५९

संदीप नाईक (उबाठा) : ४२,३२४

प्रभाग क्रमांक ७० ( ओबीसी)

हा प्रभाग पूर्वी सर्वसामान्य महिला प्रवर्गाकरता राखीव होता, परंतु आता हा प्रभाग ओबीसी करता राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाच्या सुनीता मेहता निवडून आल्या होत्या़. पण हा प्रभाग ओबीसी झाल्यामुळे सुनीता मेहता यांच्यासाठी या प्रभागाचे दरवाजे बंद झाले आहे. त्यामुळे या प्रभागातून प्रभाग ७१मधील अनिष मकवानी हे आता प्रभाग ७० मधून इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर उबाठाकडून मनोज मांजरेकर यांच्रूा नावाची चर्चा आहे. शिवाय काँग्रेसमधून माजी नगरसेवक जयंती सिरोया हे आपल्या भावाला निवडणूक रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत

प्रभाग क्रमांक ८२(ओबीसी महिला)

हा प्रभाग पूर्वी खुला असल्याने या प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर जगदीश अमीन कुट्टी हे निवडून आले होते. परंतु आता प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. जगदीश कुट्टी हे काँग्रेस सोडून भाजपात गेल्यामुळे या प्रभागावर आता भाजपाचा दावा आहे. त्यामुळे भाजपाच्यावतीने जगदीश अमीन कुट्टी यांची पत्नी जगदिश्वरी या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून आशा वाघेकर आणि राधाा मापेलकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. या प्रभागात भाजपचे उमेदवार २०१७मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याने यावर शिवसेनेला दावा करता येणार नाही.

प्रभाग क्रमांक ८३( महिला)

या प्रभाग यापूर्वी महिला राखीव होता आणि पुन्हा एकदा महिला राखीव झाला आहे. या प्रभागातून काँग्र्रेसेच्या तिकीटावर विनीफ्रेड डिसोझा या निवडून आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने या प्रभागातून डिसोझा या चौथ्या निवडणून रिंगणात न उतरता आता मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचारात असल्याचे बोलले जात आहे. डिसोझा यांची मुलगी मिलेशा डिसोझा यांनी काँग्रेसच्यावतीने इच्छुक आहेत. तर या प्रभागावर भाजपाचा डोळा असून भाजपाच्यावतीने सुरेशन हे इच्छुक आहे. परंतु सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याने या प्रभागावर शिवसेनेचा पहिला दावा असेल. त्यामुळे या प्रभागातून शिवसेनेच्यावतीने स्मिता सावंत आणि निधी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांची बायको आणि वहिनी इच्छुकाच्या रांगेत उभ्या आहेत.

प्रभाग क्रमांक ८४(महिला)

हा प्रभाग यापूर्वी खुला होता आणि आता महिला आरक्षित झाला आहे. सन २०१७मध्ये भाजपाच्या तिकीटावर अभिजित सामंत हे निवडून आले होते. परंतु आता प्रभाग महिला आरक्षित झाल्याने अभिजित सामंत हे आपली पत्नी अंजली सामंत यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचारात आहे. तर याच प्रभागातून उबाठातून भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रिध्दी धुरी याही इच्छुूक असल्याची चर्चा आहे. तर उबाठाकडून मनिषा पांचाळ यांच्याही नावाची चर्चा आहे, तर या प्रभागातून मनसेचे पदाधिकारी संदीप दळवी हे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक ८५ ( ओबीसी)

हा प्रभाग खुला होता आणि आता प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. या प्रभागातून भाजपाच्या ज्योती अळवणी या निवडून आल्या होत्या. परंतु आता आता प्रभाग ओबीसी झाल्याने अळवणी यांना हा प्रभाग सोडावा लागणार आहे. त्यामुळे भाजपाच्यावतीने मिलिंद शिंदे यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे. तर उबाठाकडून माजी नगरसेवक चंद्रकांत पवार यांचे पुत्र सिध्देश यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द उबाठा अशीच लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक ८६( सर्वसाधारण)

हा प्रभाग यापूर्वी महिला राखीव होता, परंतु आता सर्वसाधारण अर्थात खुला प्रवर्ग झाला आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर सुषमा राय या निवडून आल्या होत्या, परंतु आता कमलेश राय आणि सुषमा राय यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या प्रभागावर शिवसेनेचा दावा आहे. या प्रभागातून शिवसेनेच्यावतीने कमलेश राय यांचे पुत्र रितेश यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा तयारीत आहेत. तर काँग्रेसकडून नितीन सलागरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून इच्छुकाचे नाव चर्चेत दिसून येत आहे. या प्रभागातून निकोलस अल्मेडा हे उभे राहिल्यास तिरंंगी लढत होवू शकते. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता,असे जरी असले तरी काँग्रेसकडून निवडून आलेले नगरसेवक शिवसेनेत असल्याने भाजपाचा दावा करता येणार नाही. त्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुध्द काँग्रेस होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक ८८ ( महिला)

हा प्रभाग खुला असल्याने याठिकाणाहून उबाठाचे सदा परब हे निवडून आले होते. परंतु आता हा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे उबाठाकडून सदा परब यांना घरी बसावे लागणार आहे. त्यासाठी उबाठाकडून सदा परब हे आपल्या पत्नीला शवरी परब यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचारात आहेत. तर शिवसेनेकडून सुहास शिंदे हे आपल्या पत्नीसाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाकडून डॉ प्रसाद सामंत हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचारात असल्याची चर्चा आहे. या प्रभागात मागील निवडणुकीत भाजपा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने हा प्रभाग भाजपाला सोडला जावू शकतो. परंतु या प्रभागात उबाठाकडून उमेदवार उभा असल्याने यापूर्वी मनसेतून लढून पावणे चार हजार मते घेणाऱ्या सुहास शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास शिवसेना ही जागा जिंकू शकते. परंतु ठाकरे बंधूंची युती झाल्यास हा प्रभाग मनसे मागू शकते, परंतु सदा परब हे उबाठाचे नेते अनिल परब यांचे विश्वासू असल्याने हा प्रभाग कोणत्याही परिस्थतीत मनसेला सोडला जाण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >