Saturday, June 6, 2026

Maharashtra Monsoon 2026 : मान्सून महाराष्ट्राच्या दारात! पुढील ४८ तास निर्णायक; अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Monsoon 2026 : मान्सून महाराष्ट्राच्या दारात! पुढील ४८ तास निर्णायक; अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने वेगाने आगेकूच करत गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. आता पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीत प्रवेश करण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण आणि नैऋत्य मौसमी वाऱ्यांची वाढती तीव्रता लक्षात घेता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत ५ ते ११ जूनदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी :

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात लक्षणीय बदल जाणवत आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि पूर्वमान्सूनच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

येलो अलर्ट असलेले जिल्हे :

पालघर, ठाणे, मुंबई (उष्ण व दमट हवामानासह पावसाची शक्यता) नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर, बीड बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

मुंबईकरांना अजून थोडी प्रतीक्षा :

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात आज दिवसभर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सध्या मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात असून हवेत आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढील काही दिवसांत मान्सून मुंबईकडे सरकल्यानंतर वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा :

दरम्यान, केरळ आणि कर्नाटकमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ६ आणि ७ जून रोजी केरळमधील काही भागांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. गोव्यात मान्सूनच्या आगमनानंतर आता त्याची पुढील वाटचाल अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर परिसरात लवकरच मान्सूनच्या दमदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून, शेतकरीही आता खरीप हंगामाच्या तयारीकडे आशेने पाहत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >