Saturday, June 6, 2026

Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo : राणीबागेत आता ई-बग्गीतुन फिरता येणार पर्यटकांना!

Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo : राणीबागेत आता ई-बग्गीतुन फिरता येणार पर्यटकांना!

बच्चे कंपनींसाठी आकर्षक डबल डेकर बसचीही सुविधा

मुंबई : जिजामाता उद्यानात फिरणे आता अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी बॅटरीवर धावणाऱ्या ई-बग्गीची सुविधा, मुलांसाठी आकर्षक डबल डेकर बस आणि गर्दी नियंत्रणासाठी बांबूपासून तयार करण्यात आलेले पर्यावरणपूरक बॅरिकेड्स अशा हरित सुविधांची भर उद्यान व प्राणिसंग्रहालयात पडली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, पर्यावरण दिनानिमित्त महापौर तावडे यांनी महापौर निवासस्थानी सफेद चाफ्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

प्राणिसंग्रहालयात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि अभ्यासक भेट देत असतात. त्यांची सुविधा लक्षात घेऊन प्रत्येकी नऊ आसनी अशा चार ई-बग्गी सुरू करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुले आणि चालण्यास अडचण असलेल्या पर्यटकांसाठी ही सेवा विशेष उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय, मुलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारी १५ आसनी डबल डेकर बसही सुरू करण्यात आली असून दिव्यांगांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध असेल.

गर्दीच्या वेळी लोखंडी बॅरिकेड्सऐवजी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक बॅरिकेड्सचाही वापर करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार असून उद्यानाचा नैसर्गिक सौंदर्यवर्धनही होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >