कचरा आणि माती स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर एक दिवस आड वाहने उभी करण्यास परवानगी
नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी केले स्पष्ट
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू तथा धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आता ठोस पावले उचलली जाणार असून पावसाळ्यानंतरच धुळीचे प्रदूषण नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न केला जाईल,असे महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे पावसाळ्यानंतर चिखल स्वरुपात रस्त्याच्या कडेला जमा होणारा गाळ सुकून त्यातून धुळीचे प्रदुषण अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने कचऱ्याची आणि धुळीची साफसफाई होत नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये वाहने दिवस आड उभी करण्याच्या सूचना करून त्याची अमलबजवणी केली जाईल,असेही डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पर्यावरणाच्या विषयावर बोलतांना डॉ ढाकणे यांनी मुंबईतील वायू प्रदुषण नियंत्रणात राखणे हे चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महत्वाचे असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावसाळ्यानंतरच यासाठीच्या उपाययोजना केल्यास योग्य ठरु शकते,असे मत व्यक्त केले. पावसाळ्यानंतर रस्त्यांची साफसफाई केल्यास साचलेली धूळ निघू जाईल,असेही त्यांनी सांगितले. मात्र, भविष्यात पुढील दीड महिना वायू निर्देशांक वाढणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने आता वायू ...
खासगीसह सरकारी प्रकल्पांवरही करणार कारवाई
वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने २८ मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु खासगी प्रकल्पांसोबत महापालिका, एमएमआरडीएसह इतर सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प कामे सुरु आहेत.त्यांनाही या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु खासगी प्रकल्पांवर कारवाई करतानाच सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या दहा हजार रुपयांचा दंड असला तरी हा दंड आकारल्यानंतरही पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या दंडाची आकारणी अधिक वाढवण्याचा प्रशासनाचा विचार राहिल असेही डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पार्कवरील माती काढणे हा पर्याय नाही
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर टाकण्यात आलेली लाल मातीचा भराव काढून टाकण्याची मागणी होत आहे. परंतु, या मैदानातील लाल माती काढणे कठिण आहे. याबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल तपासला जाईल. तसेच आपण स्वत: छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट देवून पाहणी केली जाईल. या मैदानातील माती काढणे हा काही पर्याय असून शकत नाही. माती काढण्यासाठी मैदान बंद करावे लागेल. यापेक्षा या मैदानात चांगल्याप्रकारचे गवत कशाप्रकारे उगवले जाईल याचा विचार केला जाईल.