कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा आढाव यांना प्रकृती गंभीर झाल्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांपासून पुण्यातील सुप्रसिद्ध पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयू (ICU) मध्ये ठेवण्यात आले होते. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. मात्र, वृद्धापकाळामुळे आणि प्रकृतीची गंभीरता वाढल्याने उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, आज रात्री त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कामगार, रिक्षाचालक यांसारख्या असंघटित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या निधनाने कष्टकऱ्यांसाठी लढणारा एक निस्वार्थी नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशी भावना संपूर्ण राज्यात व्यक्त होत आहे.
पुणे : 'इंडिगो' च्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेल्या प्रवाशांकडून जास्तीचे शुल्क न आकारता प्रवाशांचे पैसे परत करा असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत, ...
कोण होते बाबा आढाव?
९५ वर्षांचे बाबा आढाव हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रेरणास्रोत होते. बाबा आढाव यांनी सार्वजनिक जीवनात ७० च्या दशकात सक्रिय भूमिका घेतली. ते तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि याच पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. राजकीय जीवनासोबतच, त्यांनी आपले आयुष्य कष्टकरी समाजासाठी वेचले. ते पुण्यातील रिक्षा पंचायतीचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी रिक्षाचालकांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यांची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक ओळख म्हणजे 'एक गाव एक पाणवठा' या सामाजिक समतेच्या मोहिमेचे ते प्रणेते होते. गावागावात आजही दिसून येणाऱ्या अस्पृश्यता आणि भेदभावावर मात करण्यासाठी त्यांनी ही मोहीम चालवली आणि ती यशस्वी करून दाखवली.
लढवय्या नेता ९३ व्या वर्षीही मैदानात
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी वयाच्या ९३ व्या वर्षीही आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता, देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत आंदोलन केले होते. त्यांच्या या कृतीने त्यांचा लढवय्या बाणा पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेवर बोलताना बाबा आढाव यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. आजच्या राजकारणाची अवस्था सांगताना ते म्हणाले होते की, "माणूस सकाळी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना केवळ सत्तेची भूक आहे." सत्तेसाठी सुरू असलेल्या या अस्थिर राजकारणावर भाष्य करताना त्यांनी १४० कोटी जनतेवर आपला विश्वास व्यक्त केला. बाबा आढाव म्हणाले की, हे नेते काय करत आहेत, हे जनता पाहत आहे; आणि जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं. त्याचबरोबर, राजकीय नेत्यांना जाणीव करून देत त्यांनी म्हटले की, "काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा." सध्याचे राजकारण खूप विलक्षण आणि केवळ सत्तेसाठी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय परिस्थिती किती गंभीर झाली आहे, हे दर्शवताना त्यांनी एक वैयक्तिक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, कॅनडामध्ये असलेले माझे कुटुंबीयही "भारतात नेमकं काय चाललंय?" असा प्रश्न विचारत आहेत. यावरून देशातील राजकारणाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी बिघडत आहे, यावर त्यांनी लक्ष वेधले.