नागपूर : इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही बसण्याची शक्यता आहे. अनेक मंत्री आणि आमदार राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून रविवारी विमानाने नागपूरला पोहोचतात. या मंडळींपुढे नागपूरला कसे पोहचायचे हा प्रश्न आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी मुंबई आणि इतर ठिकाणांहून विमानाने निघणार होते. इंडिगोची तिकिटांची खरेदी झाली होती. पण सलग सहाव्या दिवशीही इंडिगोचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकारण्यांना तसेच अधिकाऱ्यांनाही फटका बसला आहे. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवरील अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे व्हीआयपींसाठी इंडिगोच्या विमानाने नागपूरला पोहोचणे कठीण झाले आहे.
तिकीट रद्द करुन अनेकांनी आयत्यावेळी रेल्वेने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी समृद्धी महामार्गावरुन नागपूर गाठण्याचे नियोजन केले आहे. इंडिगो विमानाच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केल्याने नागपूर अधिवेशनासाठी विमानाने जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची आयत्यावेळी पर्यायी मार्गाने प्रवासाचे नियोजन करावे लागल्यामुळे धावपळ झाली आहे.
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार ?
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध मुद्यांवर घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदीचा व्यवहार, कथित सिडको जमीन घोटाळा, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतील. तर सरकार या प्रकरणांमध्ये स्वतःची बाजू मांडेल तसेच महत्त्वाच्या विषयांवर विधिमंडळात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करेल. विरोधक अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन कदाचित अधिवेशनाचा सर्वाधिक काळ खर्ची जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरच्या मतदानाला जेमतेम ४८ तास उरले असताना निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल केला. या मुद्यावर विधिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार यादी, मतदारसंघांचे वाटप या मुद्यांवरुन सभागृहात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यंदा पहिल्यांदाच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे विरोधकांचे नेतृत्व कोण करणार याविषयी उत्सुकता आहे. 'इंडिगो'च्या गोंधळामुळे किती नेते वेळेत पोहोचणार याविषयी संभ्रम आहे. चहापानावेळी किती नेते नागपूरमध्ये असतील हे अद्याप समजलेले नाही. पण मागील काही अधिवेशनांच्या वेळी घडलेल्या घटना बघता शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.