संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. श्री देवी भराडी देवीचे मानकरी असलेल्या आंगणे कुटुंबियांनी ही तारीख जाहीर केली आहे. आंगणे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी भराडी देवीचा हा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यात्रेची तारीख जाहीर होताच, केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच नव्हे, तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी मसुरे येथे दाखल होत असतात. कोकणच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या यात्रेसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे.
गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ...
भराडी देवीच्या यात्रेची तारीख कशी ठरते?
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा दरवर्षी एखाद्या ठराविक तिथी किंवा निश्चित तारखेला होत नाही. या यात्रोत्सवाची तारीख ठरवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धत आहे, जी कोकणच्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी गावातील मानकरी एकत्र येतात आणि विशिष्ट धार्मिक विधी पार पाडतात. त्यानंतर, देवीच्या मंदिरात पंचांग ठेवले जाते आणि प्रत्यक्ष देवीला कौल मागितला जातो. देवीचा कौल मिळाल्यानंतरच मानकरी असलेले आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून एकमताने यात्रेची अधिकृत तारीख जाहीर केली जाते. याच प्रथेनुसार यंदा ९ फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. श्री देवी भराडी आई हे कोकणातील लाखो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे आणि या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे गावातील आंगणेवाडी येथे आहे. आंगणे कुटुंबीयांचे हे खाजगी मंदिर असले तरी ते सर्व भाविकांसाठी नेहमी खुले असते. दरवर्षी केवळ एका दिवसाच्या या यात्रोत्सवात विविध राजकीय नेते, अधिकारी, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि लाखो सामान्य भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. या आगळ्या प्रथेमुळेच दरवर्षी यात्रेची तारीख कधी जाहीर होणार, याकडे संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते.
भराडी यात्रेसाठी भाविकांमध्ये लगबग सुरू
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासकीय पातळीवरही मोठ्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक देशभरातून येत असल्याने त्यांच्या प्रवासाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे येथून जास्त एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत, तसेच कोकण रेल्वे मार्गावरही जादा रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले जात आहे. एका दिवसाच्या या यात्रोत्सवात प्रचंड गर्दी होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. देवीचे मानकरी असलेले आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळ हे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारीला लागतात. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी दर्शन, निवास आणि सुरक्षा या दृष्टीने मोठी व्यवस्था उभारण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे.
भराडी देवीच्या यात्रेला कसं पोहोचाल?
मुंबई किंवा पुण्याहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी कणकवली आणि कुडाळ ही जवळची प्रमुख रेल्वे स्टेशन आहेत. या दोन्ही रेल्वे स्टेशनपासून बस डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी विशेष सोय करण्यात येते. या काळात दर अर्ध्या तासाने आंगणेवाडीसाठी बसेस सोडल्या जातात आणि एसटीच्या तिकीटाचा दरही अगदी माफक ठेवण्यात येतो, जेणेकरून सामान्य भाविकांची गैरसोय होऊ नये. जर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करणार असाल, तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत कुडाळ, कसाल किंवा कणकवली या मार्गे तुम्हाला आंगणेवाडीपर्यंतचा पुढचा प्रवास करता येईल. महामार्गावरून आंगणेवाडीकडे वळण्यासाठी योग्य ठिकाणी फलक लावलेले असतात. या सोप्या प्रवास मार्गांमुळे भाविकांना देवीच्या दर्शनासाठी येणे अधिक सुलभ होणार आहे.