व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती
मुंबई : मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टल रोडसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, पारदर्शक संवाद, विविध शासकीय संस्थांचा समन्वय आणि जनतेचा सहभाग यामुळे या प्रकल्पांना यश मिळाल्याचे मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव तथा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.
भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत. बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांनी मेट्रो आणि किनारी मार्ग या प्रकल्पाच्या उभारणीमागचे नियोजन, कार्यपद्धती उलगडून सांगितली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन) अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मानद सचिव विजय सतबीरसिंग, खजिनदार विकास देवधर आदी यावेळी उपस्थित होते. अश्विनी भिडे यांनी भारतातील पहिली संपूर्ण भुयारी मेट्रो लाईन ३ कुलाबा ते सिप्झच्या निर्मिती मागची संपूर्ण माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
अपर मुख्य सचिव भिडे म्हणाल्या की, संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो प्रकल्प हा केवळ अभियंता प्रकल्प नसून सामाजिक अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. पाचपेक्षा अधिक वर्षे वर्दळीची ठिकाणे, रहिवासी भागात काम चालले असतानाही व्यापक संवाद आणि समाजमाध्यमाद्वारे पारदर्शकपणे माहिती दिल्यामुळे लोकांचा विश्वास टिकवता आला. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनपूर्वक पूर्वतयारी, सक्षम व कटिबद्ध नेतृत्व, जलद निर्णय क्षमता, कामाच्या ठिकाणाची सतत पाहणी व आढावा, उत्तम सांघिक कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांशी खुला संवाद, समस्या सोडविण्याची वृत्ती आणि राजकीय इच्छाशक्ती हे सर्वात महत्त्वाचे घटक ठरले. मुंबई पोलीस, महापालिका, बंदरे, रेल्वे, संरक्षण, विमानतळ प्राधिकरण आदी विविध संस्थांच्या समन्वयामुळे आणि मुख्यमंत्री वॉररुममधील सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंब्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
आतापर्यंत अटल सेतू, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक सागरी किनारी मार्ग आणि नवी मुंबई विमानतळ हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर बांद्रा-वर्सोवा, वर्सोवा-दहिसर-भाईंदर व उत्तन विरार हे सागरी किनारा मार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ते समृद्धी महामार्ग तसेच बोरीवली-ठाणे टनेल, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह टनेल रोड यांची कामे सुरू आहेत. याशिवाय पुढील काळात विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर आणि वाढवण बंदर हे प्रकल्प सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी भुयारी मेट्रोचा प्रकल्प उभारणे ही अतिशय कठिण गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्राने ती साध्य केली आहे. राज्यातील या प्रकल्पाची यशस्विता पाहून दिल्लीतील मेट्रोही भुयारी करण्याची मागणी होत आहे. अशा प्रकल्पातून नागरिकांना चांगली सेवा मिळते. याप्रमाणेच प्रशासनातील प्रत्येकाने सांघिक व सकारात्मक भावनेने काम करावे.