दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला. आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार गुरुवारी स्थापन होत आहे. पुढील सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
‘जेडीयू’चे प्रमुख नितीश कुमार यांची पाटणा येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवडण्यात करण्यात आली. त्यामुळे ते पुढील मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आठवे एनडीए सरकार शपथ घेणार आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील हे दहावे सरकार असेल.
भाजपने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना निरीक्षक म्हणून आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते निवडण्यासाठी सह-निरीक्षक म्हणून पाटणा येथे पाठवले होते. बैठकीनंतर केशव मौर्य यांनी औपचारिकपणे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांची नेते आणि उपनेते म्हणून निवड जाहीर केली. भाजपने उपमुख्यमंत्रीपदासाठी आपल्या जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवताना सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत दोघांनाही त्यांच्या पदांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये सुशील कुमार मोदी, तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा यांनी वेगवेगळ्या टर्मसाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.