मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे आणि इतर पक्षांमधून आऊटगोईंग सुरू आहे. भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत असंतोष वाढू लागला आहे.
शिवसेनेतला असंतोष टोकाला जाण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने भाजप विरोधात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शिवसेना आणि भाजप यांच्यात तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेनेने भाजपला थेट युती तोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. सध्या राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीतली धुसफूस वाढली आहे. दुसरीकडे मविआतसुद्धा राजकीय मारामारी जोर धरू लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिउबाठाला वगळून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी मनसेला मविआत घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
बिहारमधील शपथविधीला फडणवीस आणि अजित पवार जाणार
बिहारमध्ये गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित असतील की नाही हे अद्याप समजलेले नाही. एनडीएतील इतर घटक पक्षांचे सर्वोच्च नेते तसेच एनडीएचे सर्व मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील.