केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर
कल्याण : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार'',असे उत्तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिकेवर भाजपचा महापौर बसविण्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यावर खा.शिंदे यांनी हा टोला हाणला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. कल्याण पूर्व येथे आयोजित विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव २०२५ कार्यक्रमात खा. श्रीकांत शिंदे यांचा आज सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आणि भव्य पुतळा उभारून कल्याणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केल्याबद्दल आयोजक मंडळातर्फे त्यांचा मानपत्र, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या भीम महोत्सवाला नागरिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. गायक साजन बेंद्रे आणि गायिका कडूबाई खरात यांच्या गाण्याचा कार्यक्रमदेखील होता. यावेळी आमदार राजेश मोरे, अण्णा रोकडे, देवचंद आंबादे, समितीचे अध्यक्ष सुमेध हुमणे, अतिश गायकवाड, राजू रोकडे, शिवसेनेचे महेश गायकवाड, निलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. शिंदे यांनी सामाजिक प्रबोधन, शिक्षणवाढ, तसेच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा शहरात अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढील काळातही विकासकामे सुरू राहतील, असे आश्वासन दिले. कल्याण पूर्वेत लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा असे वाटत होते. त्या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण येता कामा नये, असे खा. शिंदे यांनी सांगितले. आपण कोणालाही उद्देशून बोललेलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.