दिल्ली स्फोटाच्या तपासाचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे नेतृत्व
नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या तपासासाठी १० अधिकाऱ्यांचे जे विशेष पथक तयार केले आहे, त्याचे नेतृत्व अतिरिक्त महासंचालक विजय साखरे या मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. मूळचे नागपूरचे असलेले साखरे हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. साखरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकात एक पोलीस सहसंचालक, तीन पोलीस उपसंचालक आणि तीन पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. या पथकासमोर दिल्लीतील स्फोटाच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान असणार आहे.
विजय साखरे हे १९९६ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी एनआयएमध्ये महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे. केरळमध्ये अनेक महत्वाच्या वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना एनआयएचे एडीजी म्हणून नियुक्त करण्यात आले.
दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या तपासातील प्रगतीबाबत एनआयएचे महासंचालक सदानंद दाते आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख यांच्यात बुधवारी बैठक झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएचे पथक जयप्रकाश नारायण रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करतील. हे पथक जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि हरियाणा पोलिसांकडून "जैश ए महंमद मॉड्यूल" शी संबंधित सर्व डायऱ्याही ताब्यात घेईल.
दरम्यान, दिल्ली स्फोटाचे धागेदोरे असल्याच्या संशयावरून दिल्लीजवळील फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाचीही कसून तपासणी सुरू आहे. विद्यापीठाशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना आधीच अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी येथून आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
तपास यंत्रणांनी अल-फलाह विद्यापीठातील ५० हून अधिक लोकांची आधीच चौकशी केली आहे. या व्यक्तींमध्ये विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल यांच्यासोबत काही प्राध्यापक, विद्यार्थी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.