४० हून अधिक जखमी, एका संशयितास अटक, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांना ‘हायअलर्ट’, दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हाय सेक्युरिटी झोन असलेल्या भागात एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. हा आयईडीचा स्फोट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटानंतर जवळपासच्या गाड्यांनी पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या स्फोटात किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाल्याची महिती मिळत आहे. मृताचे व जखमींचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने तपास केला जात आहे. हा स्फोट खूप भीषण होता. परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्थ पडलेले बघायला मिळत आहेत. या घटनेमागे नेमके कारण काय आहे? हा दहशतवादी हल्ला होता की दुसरे काही होते? ते अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोण लगतच्या वाहनांपर्यंत पोहोचले. दरम्यान अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर १ च्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर गाडीला भीषण आग लागली. आग इतकी मोठी होती की, बाजूच्या दोन गाड्यांनादेखील आग लागली. गाडीत स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज आला. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. परिसरातील दुकानांची काच फुटली. या स्फोटात पार्किंगमधील गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटानंतर घटनास्थळी काही गाड्यांचा केवळ सांगाडा दिसत आहे. ही घटना खूप भीषण आहे. हा परिसर अत्यंत रहदारीचा परिसर आहे. पोलिसांनी तत्काळ परिसर रिकामा करून लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या आसपास सुरक्षा वाढवली आहे. इथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची यावेळी गर्दी असते. गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने हा दहशतवादी कट होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून शोध तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. या स्फोटाने देशभर खळबळ उडाली असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे.
सगळ्याच गोष्टींच्या तपासाचे आदेश : अमित शहा
लाल किल्ला परिसरातील कार स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांना आपण घटनास्थळी लगेच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या स्फोटाच्या सर्वच संभावनांचा तपास करत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. घटनास्थळाबरोबरच अमित शहा रुग्णालयातही जाणार आहेत. तसेच या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येईल, अशी माहिती शहा यांनी दिली. सध्या तपासाकरिता स्फोटाच्या ठिकाणचे सर्वच अवशेष एकत्र करण्यात येत आहेत, अशी माहितीही शहा यांनी दिली. दिल्ली क्राईम ब्रँच तसेच दिल्ली पोलीस, एनएसजी, एएफएस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तपासाला सुरुवातही केली आहे. या घटनास्थळाजवळच्या तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि सगळ्याच गोष्टींच्या तपासाचे आदेश दिले आहेत, अशीही माहिती अमित शहा यांनी दिली. स्पेशल ब्रँच, तसेच सीपी दिल्ली घटनास्थळी आहेत. या पूर्ण तपासाची संपूर्ण माहिती जनतेला देण्यात येईल, असे शेवटी शहा यांनी सांगितले.
दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट
- दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेने दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
- घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब पोहोचले असून पोलिसांनी परिसराला वेढा घालताना घटनास्थळावरून गर्दी हटवण्यात येत आहे एनआयए आणि एनएसजी कमांडोदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पण या स्फोटात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चार दिवसांत, ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिल्ली पोलिसांनी काही संशयितांना पकडले आहे. त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे घातापाताचा संशय अधिक बळावला आहे.
स्फोट झालेली आय २० गाडी हरयाणातील...
- दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, त्याबद्दल दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी स्फोट झालेल्या कारबद्दल माहिती दिली.
- स्फोटानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले, सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी एक हळूहळू आलेले एक वाहन रेड लाईटजवळ येऊन थांबले होते. त्यात हा स्फोट झाला आहे. त्यावेळी गाडीमध्ये काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूला असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. जशी याबद्दल माहिती मिळाली, तसे सगळ्या यंत्रणा घटना स्थळी आले.
- परिस्थितीची पाहणी करत आहे. या स्फोटाचा तपास केला जात आहे. या घटनेचा तपास करून जे काही आढळून येईल, ते माध्यमांना सांगितले जाईल. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त गोलचा यांनी दिली. ज्या गाडीत स्फोट झाला, ती आय २० होती. या गाडीची पासिंग गुरुग्रामची होती म्हणजे ती हरयाणातील होती. सध्या पोलीस ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहे.
दिल्लीत स्फोट होताच मुंबईत खाकी वर्दीची गस्त
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मुंबईच्या सीसीएसटी परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलीस सध्या हायअलर्टवर आहेत. या शहरात जिथे-तिथे पोलीस दिसत आहेत. खबरदारी म्हणून सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांची पथकंच्या पथकं सर्वत्र फिरताना दिसत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात काही दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशात पडतो. त्यामुळेच आता खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी करत खबरदारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लातील स्फोटानंतर मुंबईसह पुणे शहरातही हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.