Saturday, August 22, 2026

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात 75 आणि 51 वर्षांचे दोन पुरुष जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:49 वाजता महामार्गावर एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी गुरुद्वारात चाकू हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दोन भाविकांवर हल्ला

संशयित गुरुद्वारात घुसला आणि प्रार्थनास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होता. गुरुद्वारा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्यानंतर वाद वाढला. यावेळी त्याने दोन पुरुष भाविकांवर चाकूने हल्ला केला. मात्र, उपस्थित साक्षीदारांनी वेळीच हस्तक्षेप करून संशयिताला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा 2015 पासून हिंसक हल्ल्यांचा इतिहास आहे. हल्ल्याच्या आदल्या दिवशीच तो अल्बर्टा येथील फेडरल तुरुंगातून बाहेर आला होता. शांतता अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी तो शिक्षा भोगत होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला एडमंटनमधील पुनर्वसन केंद्रात दाखल होण्याचे निर्देश होते; मात्र तो तेथे पोहोचला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्ल्यामागे नेमका हेतू काय?

या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार द्वेषपूर्ण विचारसरणीतून किंवा शीखविरोधी भावनेतून झाला आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. हल्ल्यादरम्यान गुरुद्वारातील शीख धर्मग्रंथाच्या प्रतीची विटंबना झाल्याचा दावा जागतिक शीख संघटनेने केला असून, पोलिसांनीही या आरोपाची चौकशी सुरू केली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हल्ल्याचा निषेध करत जखमी व्यक्ती आणि शीख समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त केली. दरम्यान, तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित गुरुद्वारा नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >