Saturday, August 22, 2026

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘दिवाळी डे’ म्हणून मान्यता दिली आहे. असेंब्ली सदस्य दर्शना पटेल आणि ऐश कालरा यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाच्या माध्यमातून कॅलिफोर्नियातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (California Assembly)

या निर्णयामुळे भारतीय-अमेरिकन तसेच जगभरातील भारतीय समुदायाच्या सांस्कृतिक परंपरांचा आणि योगदानाचा सन्मान झाल्याचे मानले जात आहे.

भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदायासाठी महत्त्वाचा सण :

कॅलिफोर्निया असेंब्लीने मंजूर केलेल्या प्रस्तावात दिवाळी हा भारतीय-अमेरिकन आणि दक्षिण आशियाई-अमेरिकन समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि जगभरात हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीय समुदायांकडून दरवर्षी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. प्रस्तावात ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी सणाला मान्यता देण्यात आली असून, कॅलिफोर्नियातील नागरिकांनी या आनंदाच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (California Assembly)

‘प्रकाशाचा सण’ म्हणून दिवाळीची ओळख :

दिवाळीला ‘प्रकाशाचा सण’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी घरे दिवे, पणत्या आणि मेणबत्त्यांनी सजवली जातात. कुटुंबीय आणि मित्र एकत्र येऊन आनंद, कृतज्ञता आणि समृद्धीचा उत्सव साजरा करतात. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ज्ञान, शांतता, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासोबतच समाजात एकता, उदारता आणि दयाभाव वाढवण्याचा संदेशही दिवाळी देते. (California Assembly)

भारतीय संस्कृतीचा अमेरिकेत वाढता प्रभाव :

कॅलिफोर्निया असेंब्लीच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. विविध धर्म आणि संस्कृतींना एकत्र आणणारा दिवाळीचा संदेश कॅलिफोर्नियातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (California Assembly)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >