मुंबई : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार येथील भूखंडांचा ई लिलाव करून येथे व्यावसायिक आणि काही प्रमाणात निवासी संकुले उभारण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीला अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. वडाळ्यातील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. हा भूखंडाचे क्षेत्रफळ १०८६० चौरस मीटर असून या भूखंडावरील अनुज्ञेय बांधकाम १,०८,६०० चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पात्र निविदाकाराला या भूखंडाचे ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.
एमएमआरडीए वडाळा येथील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली. १०८६० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार असून या ई लिलावातून एमएमआरडीएला किमान १६२९ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने चार महानगरांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एमएमआर क्षेत्राचा समावेश आहे.
१५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव :
निविदेनुसार या भूखंडाच्या ई लिलावासाठी १,५०,००० रुपये प्रति चौरस मीटर असे राखीव दर निश्चित करण्यात आले आहेत. या राखीव दरानुसार एमएमआरडीएला या भूखंडाच्या ई लिलावातून किमान १६२९ कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएने २००८ मध्ये वडाळ्यातील दोन भूखंडांच्या ई लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र आर्थिक मंदीमुळे या ई लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने २०१० मध्ये याच भूखंडांसाठी पुन्हा ई निविदा काढल्या आणि त्यास प्रतिसाद मिळाला. लोढा समूहाने ४०५३ कोटी रुपयांत भूखंड खरेदी केले आणि त्यावर न्यू कफ परेड नावाने टाऊनशीप उभारली. आता १५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव करण्यात येणार आहे.
वडाळ्यातील भुखंड विक्रीमुळे एमएमआरडीए होणार मालामाल, ई-लिलावातून १६०० कोटींहून अधिकचा महसूल मिळणार, भुखंड विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध , व्यावसायिक आणि निवासी संकुले उभारण्यात येणार